अॅटलांटा मराठी शाळा


महाराष्ट्रातील मराठी शाळा बंद होत असल्याचे ददुैवी वास्तव आपण सध्या अनुभवतो आहोत. या पार्श्वभूमीवर, परदेशात राहणारी मराठी मंडळी आपल्या पुढच्या पिढीला मराठी अवगत होण्यासाठी तिकडे अत्यांत चांगल्या प्रकारे मराठी शाळा चालवत आहेत. अॅटलाांटा मराठी शाळा...
अॅटलांटा मराठी शाळा...


--रीना चव्हाण
संपर्क
अॅटलांटा मराठी शाळा

पाऊस भेट


बिजलीच्या नृत्याला मेघांची साथ. कोसळत्या धारा आणि चिंब ओली रात.
वाऱ्यावर स्वार रातराणीचे उ:श्वास, ना स्वप्न ना सत्य हे मृगजळी भास.
चांदण्याचं आर्जव घालू दे सडा, वरूणाची मिजास ओथंबून वाहे घडा.

तो पाऊस नको थांबू दे आणि मला तिथे पोहोचू दे.
साज-शृंगार ल्यालेला, मला साजेसा दिसू दे.
त्याला पाऊस सुचू दे आणि मला तो साठवू दे.
वरुणाच्या नभातील आर्द्र वर्षा मी होऊ दे.

तू येताच मात्र पावसाने रिप-रिप पडावं.
आणि मी धुकं होऊन तुला कुंद हवेत न्याहाळावं.
स्वत: चिंब भिजून पावसाने आपल्याला सोबत करावी.
आणि तल्लीन होऊन आभाळाने रिमझिम धून विणावी.

या थेंबांत मला तू दिसावीस.
या थेंबांत मला तू भेटावीस.
या प्रत्येक भेटीत आपण एक आरसपानी कविता साकारावी.
आणि त्या कवितेतल्या आरशांतून मृग नक्षत्राची बरसात व्हावी.

कधी दिसावं तू केवड्याच्या बनात, त्याला अत्तर लावताना.
कधी दिसावं तू मज प्रभाती, सूर्याला तेजस्वी करताना.
कधी दिसावं तू काळोखात, रातराणीला मोहित करताना.
कधी तू रंगवावा निशिगंध आणि मी पाहावं त्याला खजील होताना.
कधी दिसावा शरद, पौर्णिमेस, तुझं चांदणं उसनं मागताना.
कधी दिसावं तू रत्नाकरापाशी, लाटांची रांगोळी रेखाटताना.
कधी दिसावा, पाऊस मनसोक्त बिनधास्त ओलावा तुझा चोरताना.
कधी मी घर बांधावं शिंपल्याचं आणि घट्ट ओवून घ्यावं, तुझ्या सरीतला एक मोती होताना.

-- मेघनाद चित्रे
मेघनादचा ब्लॉग

गुढी पाडवा - पावित्र्य व नाविन्याचा पुन: आरंभ


चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थातच वर्षप्रतिपदा हा दिवस म्हणजेच गुढी पाडवा. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मीती केलेला हा दिवस. त्याचमुळे समस्त हिंदू लोकांमध्ये ह्या दिवसाला अनन्य साधारण महत्त्व आहे. हिंदू कालगणना ही सृष्टीच्या चक्रावर आधारीत आहे. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशीर हे प्रमुख सहा ऋतू. शिशीरात झालेल्या पानगळीमुळे सृष्टीत एक रितेपण येते आणि तेथूनच एक नवनिर्मीती उदयास येते. त्याचे सहर्ष स्वागत करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. झाडांवर फुटणारी नवीन पालवी, फुलझाडांवर बहरणाऱ्या कळ्या, फळांच्या आधी अंकुरणारा मोहोर ह्यामुळे सर्वत्र नवचैतन्याची जाणीव होत असते. हे चैतन्य आपल्यात सामावून घेण्यासाठी व वर्षभर पुरेल इतकी उर्जा मिळण्यासाठीच ह्या सण- उत्सवांचा प्रपंच असावा.

गुढी पाडव्याच्या नैसर्गिक महत्त्वा बरोबरच ऐतिहासीक व अध्यात्मिक महत्त्व जाणून घेताना आपल्याला दोन प्रमुख आख्यायिका लक्षात येतात.
१. प्रभु श्री रामचंद्रांनी रावणाचा वध करुन विजय मिळविला - सत्याचा असत्यावर विजय, न्यायाचा अन्यायावर विजय, सत्प्रवृतींचा दुष्टप्रवृतींवर विजय, सत्कर्माचा दुष्कर्मावर विजय. ज्या दिवशी श्रीराम रावणवधानंतर अयोध्येला परत आले, त्या दिवशी श्रीरामांच्या ह्या विजयाचे आणि आनंदाचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी (ब्रह्मध्वज) उभारली होती. विजयाचे प्रतीक हे उंच असते, म्हणून गुढी उंच उभी केली जाते.

२. शालिवाहन शक चालू झाल्याचा दिवस ! शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळविला तोही हाच दिवस अर्थात् गुढीपाडवा. या दिवसापासूनच शालिवाहन शक सुरू झाले; कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय प्राप्त केला.

असा हा वैशिष्ट्यपूर्ण दिवस ३.५ मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे नवीन खरेदी, शुभकार्याची सुरुवात करणास उत्तम. ह्याची जोड पारंपारीक उत्सवाला देऊन हा आनंद आपण बहुगुणीत करत असतो.

गुढी उभी करायच्या पारंपारीक पद्धतीत उंच बांबूपासून बनवलेली काठी, रेशमी वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, साखरेची गाठी आणि कलश ह्यांचा वापर होतो.
वरील तांत्रिक वा आध्यात्मिक गृहिते व प्रतिके माना अथवा न माना पण आधुनिक जगात त्यातील भावार्थ हेच सुचवितो की गुढीच्या काठीसारखी उंच ध्येय असावीत. ती गाठताना रेशमी वस्त्रांसारखी मनाची तरलता जोपासून ठेवावी. साखरे सारखी मधुर वाणी असावी पण प्रसंगी समाजातील मानसिक आजारांना कडुलिंबाचे रामबाण औषध देऊन संपूर्णतेचे प्रतिक असलेल्या कलशाप्रमाणे एक परिपूर्ण समाजनिर्मीतीचा संकल्प करुयात.

ह्या प्रसंगी बहिणाबाईंच्या ह्या ओळी खूप समर्पक वाटतात.

गुढीपाडव्याचा सन
आतां उभारा रे गुढी
नव्या वरसाचं देनं
सोडा मनांतली आढी
गेलं साली गेली आढी
आतां पाडवा पाडवा
तुम्ही येरांयेरांवरी
लोभ वाढवा वाढवा
गुढी पाडवा व नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा...!


-- सचिन पिसोळकर